मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

पहिला ‘सरकारी, माधवराव नारायण ( पंत पंधान) यांस'; दुसरा सरकारी, ‘नाना (फडणीसास) स;' आणि तिसरा खासगी, ‘ गोविंदराव भगवंत यास', हा तिन्ही मुखांचा पत्रव्यवहार एकाच खर्ड्याच्या लढाईसंबंधीं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चालणा-या कारस्थानांचा द्योतक आहे. त्यामुळें एकाच मित्तीर्ची त्याच त्याच बाबतीचीं पत्रें गोविंदराव कृष्ण याचीं माधवराव नारायण पंतप्रधान, नाना फडणवीस आणि गोविंदराव भगवंत या तिघांस गेलेलीं पाहावयास सांपडून ह्या त्रिवर्गांचीं परस्पर नातीं, यांचीं व्यक्तिनिष्ट व अन्यसापेक्ष धोरणें, त्याचप्रमाणें ह्यावेळीं नुकतीच अस्तित्वांत येऊं पाहत असणारी इंग्रजी सत्ता ह्मणजे तराजूनें तरवारीच्या साहाय्यानें मांडलेला बुद्धिबलाचा डाव आपणांस कसा काय फळेल किंवा नडेल ह्याबद्दलचें ह्या मराठी राज्यकार्यधुरंधरांचे संशय इत्यादिकांचे वाचकांस चांगलेंच दर्शन घडेल. त्याचप्रमाणें मराठे सरदारांत ह्यावेळीं परस्परांविषयीं कितपत स्नेहबुद्धि वसत होती, त्यांचें आपल्या स्वामीसंबंधीं कितपत प्रेम होतें आणि ह्या प्रसंगीं ह्मणजे खर्ड्याच्या लढांईत त्यांना एके ठिकाणीं आणण्याचें काम कोणा राज्यकार्यधुरंधरानें आपल्या चातुर्यानें साधलें हें पाहणेंही मोठें कौतुकास्पद असून तितकेंच बोधप्रदही आहे. त्याविषयीं आह्मी आपले ग्रह हा पत्रव्यवहार बराचसा छापून झाल्यावर निश्चयात्मक असे लोकांपुढें स्वतंत्र प्रस्तावनारूपानें मांडणारच आहों. तेव्हां सध्यां अधिक कांहीं लिहित नाहीं. मात्र हा पत्रव्यवहार अव्याहत छापून निघण्याचें काम फार खर्चाचें व श्रमाचें आहे. पैकीं श्रम आमच्याजवळ आहेत. परंतु द्रव्य आमच्या महाराष्ट्र बांधवांनींच सवडींत सवड करून पुरविलें पाहिजे. वार्षिक खर्च केवळ छापण्याचा निघाला ह्मणजे हें काम पडूं न देण्याचें आह्मीं आनंदानें अभिवचन देतों. कोणीं उदार आत्म्यानें जर दहा, वीस, पंचवीस, पन्नास असे रुपये बुडीत खर्चास ह्मणून दिले तर त्यांवा आह्मी मोठ्या आदरानें स्वीकार करूं;