मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

१५. येथें कित्येक लोंक अशी शंका आणतात कीं, पूर्वात्य समाजाला प्रगतीच्या मार्गाला जाण्याचे अधूनमधून झटके मात्र येतात, सातत्यानें प्रगतीचा मार्ग अव्याहत क्रमण्याचा अभ्यास त्या समाजाच्या अंगवळणीं पडलेला नाहीं. यूरोपीयन समाज आज दोन हजार वर्षे प्रगतीचा व स्वातंत्र्याचा हव्यास धरून जसा चालला आहे तसा पूर्वात्य समाज चाललेला दिसत नाहीं. ह्या शंकेला उत्तर एकच आहे. तें हें कीं, हा कोटिक्रम निव्वळ खोटा आहे. अथेन्सची शंभर वर्षे व रोमची दीडशें वर्षे चांगल्या प्रगतीचीं गेलीं. पुढें हजार बाराशें वर्षे यूरोपांत जो काळाकुट्ट अंधार पडला त्यांतून यूरोपांतील कांही अर्वाचीन राष्ट्रें बाहेर पडून नुकती कोठें तीन सवातीनशें वर्षे झालीं आहेत. प्रगतीचे अव्याहत सातत्य येथें तर शेंकडों वर्षे अजीबात नाहींसें झालेलें दिसतें. अलीकडील तीनशें वर्षांतहि प्रगतीची संतती यूरोपांत अगदी अव्याहत चालली आहे, असेंहि निश्चयानें म्हणतां येत नाहीं. रशिया तर अजून देखील प्रगतीच्या विरूध्दच आहे. ग्रीस, इटली, जर्मनी, हे देश राष्ट्राच्या पदवीला पोचून पन्नास पाऊणशेंहि वर्षे अद्याप लोटलीं नाहींत. रूमेनिया, बल्गेरिया, वगैरे राष्ट्रें तर निव्वळ रडतराऊ घोड्यावर बसविल्यासारखीं आहेत. आणि आस्ट्रिया हंगारीशीं भांडण्यांत हैराण आहे. डेन्मार्क, स्वीडन नार्वे, स्वीत्सर्लंड, बेल्जम, हॉलंड, हीं छोटेखानी राष्ट्रें इतर बड्या राष्ट्रांच्या परस्परमत्सरानें व दयार्द्रबुद्धीनें अद्याप जीव धरून आहेत. रहातां राहिलें इंग्लंड व फ्रान्स. पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीपर्यंत इंग्लंड जुलुमी राजांच्या अमलाखालींच होतें. अलीकडील अडीचशें वर्षांत मात्र तें प्रगतीच्या मार्गाला थोडेंबहुत लागल्यासारखें दिसतें वस्तुत: पहातां इंग्लंडांतदेखील न्याय, नीति किंवा स्वतंत्रता ह्यांचा फैलाव राष्ट्रांतील सर्व लोकांत झाला आहे, असें म्हणतां येत नाहीं. इंग्लंडांतील राज्ययंत्र पंधरा सोळा महाजनांच्या हातीं असून, परदेशाशीं जें कांहीं राजकारण करावयाचें, तें हे लोक आपल्याच जबाबदारीवर करतात, पार्लमेटचा किंवा लोकांचा ह्या बाबीसंबंधानें त्यांच्यावर वस्तुत: फारसा दाब असतो असें नाहीं. इंग्लंडांतील गृहनीति पहावी, तर आयर्लंडाचे निर्दय हाल करण्यांत तें आज पांचशें वर्षे दंग झालेलें आहे. कानडा, दक्षिण आफ्रिका, हिंदुस्थान, वगैरे भागांत दहा दहा वीस वीस वर्षांनी बंडें होतातच आहेत आणि पुढें किती होतील याचा अंदाज नाहीं. इंग्लंडच्या प्रगतीची ही अशी कथा आहे. फ्रान्सकडे पहावें तर त्याचा एक लचका जर्मनीनें तोडला असून, बहुतेक दर वर्षाला प्रधानमंडळ बदलण्याचा प्रसंग येत असल्यामुळें राज्ययंत्राची प्रकृति अगदीं काटेतोल झालेली आढळते. शिवाय १७९३, १७९५, १७९९, १८०३, १८१४, १८१५, १८३०, १८४८, १८५२, १८७० ह्या दहा प्रसंर्गी राजक्रांत्या झाल्याकारणानें फ्रेंच राज्ययंत्र बरेंच खिळखिळीतं झालेलें दिसतें. स्पेन व पोर्तुगाल ह्या जुनाट व मागासलेल्या (लढण्याच्या कामांत) देशांना तर सध्यां कोणी विचारीतसुद्धां नाहीं. त्यांना एशिआटिक समजत नाहींत हेंच महद्भाग्य ! पोलंड, फिन्लंड, आयर्लंड, आल्सेस लॉरेन्स, होल्स्टेन वगैरे देशांतील समाजांचा राष्ट्रनाश होऊन प्रगतीचा मार्ग कायमचा बंद झालेला आहे. सारांश, यूरोपांतहि अशी दंगल चाललेली आहे; व तटस्थ प्रेक्षकाला तींत दारूनें झिंगलेल्या कातक-यांच्या समाजांतल्यापेक्षां जास्त प्रगति दिसून आली नाहीं, तर काहीं मोठेसें नवल नाहीं.