मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

१४. ही व्याख्या भारतवर्षातील लोकांना कांहीं अश्रुतपूर्व नाहीं. राज्ययंत्र उत्तमोत्तम ठेवून व सैन्याच्या जोरावर अंतस्थ व बहिःस्थ शत्रूंचा नाश करून, धर्म, न्याय, नीति व स्वास्थ्य ह्यांचा लाभ करून घेण्याकरितां, चातुर्वर्ण्याची पद्धत भारतीय आर्यांनी काढिली, हें सुप्रसिद्ध आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी ही पद्धत भारतवर्षांत इतकी नामी सुरूं झाली होती कीं, ग्रीस देशांत अल्लातून नामक जो तत्त्ववेत्ता झाला, त्याला ती सर्वतोपरी अनुकरणीय वाटली अल्लातूनानें Republic ऊर्फ सुराज्य नामक जो ग्रंथ लिहिला, त्यांत अथपासून इतिपर्यंत चातुर्वर्ण्याचेच गोडवे गाईलेले आहेत. क्षत्रियांनी व ब्राह्मणांनीं सैन्याच्या जोरावर अंतस्थ व बहि:स्थ शत्रूंचा नाश करून राज्ययंत्र कांहीं काल इतकें सुव्यवस्थित ठेवलें कीं, सर्व शास्त्रांत गहन विचार करणारे तत्त्ववेते आणि अखिल प्राणिमात्राला समबुद्धीनें लेखणारे स्थितप्रज्ञ ह्या पवित्र भूमींत उत्पन्न होऊन ऋद्धि व सिद्धि साक्षात् अवतीर्ण झाल्या. समबुद्धीचा प्रकर्ष आर्यभूमींत त्या कालापासून इतका झाला कीं, शत्रु व मित्र ह्यांशी एकसारखें वागण्याचें वळण देशांतील सर्व लोकांना लागलें. असुर, यवन, पल्लव, शक, मुसलमान, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज वगैरे नाना प्रकारचे अन्नाकरितां हपापलेले म्लेंछ लोक अपहारबुद्धीनें आले असतां, त्यांच्याशींहि एतद्देशीयांनी सात्विक भावानें समबुद्धि ठेविली. अमेरिकेंतील तांबड्या इंडियनांच्या किंवा आफ्रिकेंतील निग्रोंच्या अज्ञानोज्जृंभित अनास्थेहून आर्यांची ही सात्विक समबुद्धि निराळी आहे हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. नाहींतर, इंडियनांच्याप्रमाणें किंवा नीग्रोंच्याप्रमाणें भारतीय आर्य दोन हजार वर्षांपूर्वीच नामशेष झाले असते. Liberty, Fraternity व Equality , ह्या त्रिगुणात्मक समबुद्धीनें फ्रेंच लोकानीं जसें आपलें नुकसान वारंवार करून घेतलें आहे, तसेंच भारतीय आर्यांनींहि शत्रुमित्रांशी सात्विक समबुद्धि ठेविल्यानें अपरिमित नुकसान करून घेतलें आहे. परंतु, सर्पाला दूध पाजून, थोर नीतिमत्तेचा, अचाट बुद्धिमत्तेचा व अपार संपन्नतेचा घात होत आहे असें अनुभवास आलें, म्हणजे, निरुपायानें असल्या कृतघ्न सर्पाचे दांत पाडावयाला आर्यांनीं कमी केलेलें नाहीं. दोन हजार वर्षांपूर्वी जुनरास पन्नास शंभर वर्षे राज्य करणा-या शकांची, तीनशें वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत सुलतानी गाजविणा-या मुलसमानांची, दीडशें वर्षांपूर्वी उत्तरकोंकणांत अन्याय करणा-या रानटी पोर्तुगीजांची, किंवा निजामाच्या राज्यांत आगंतुकी करणा-या फ्रेंचाची, मराठ्यांनी कायमची उचलबांगडी केली, ती वरील विधानाचें सत्यत्व स्थापित करण्यास पुरे आहे. (१) महाराष्ट्रांतील आर्य लोक परकीय लोकांशीं प्रथम समबुद्धीनें वागतात; (२) नंतर नीतीला एकीकडे सारून कृतघ्नपणानें आगंतुक लोक शिरजोर झाले म्हणजे आश्चर्यानें चकित होतात; (३) पुढें ह्या शिरजोर व नीतिभ्रष्ट नराधमांच्या मनाची व हेतूंची संथपणें पुरती परीक्षा करितात; (४) आणि शेवटीं लत्ताप्रहार करून त्यांचें निष्कासन करितात; असा चतुर्विध सिद्धान्त निळकंठराव कीर्तने व माधवराव रानडे यांनी हिराबागेंतील एका व्याख्यानांत प्रतिपादिलेला प्रसिद्ध आहे. सारांश, उत्तम गतीकडे म्हणजे प्रगतीकडे जाण्याचे जे पाश्चात्य लोकांचे आधुनिक मार्ग आहेत, त्यांहून बरेच निराळे परंतु अत्यंत उदात्त मार्ग पूर्वेकडील भारतीय आर्यांचे व विशेषतः मराठ्यांचे फार पुरातन कालापासूनच आहेत हिंदुस्थानांत उत्पन्न झालेली बौद्ध संस्कृति ज्यांच्या अंगांत भिनली आहे, त्या जपानी लोकांनी तर यूरोपीयन लोक ज्याला Militarism म्हणतात त्याच्या जोरावर “प्रगतीचा” मार्ग अलीकडे फारच सुधारलेला आहे. आणि अशी जर वस्तुस्थिति आहे, तर जगाच्या इतिहासाचा खोल विचार करतांना पूर्वात्य देशांतील इतिहासाची गणना केल्याशिवाय इतिहासशास्त्राला संपूर्णता येणार कशी व इतिहासाचें समग्र तत्त्वदर्शन होणार कसें ?