मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

येणेंप्रमाणें तिस-या वर्गांतील बखरींची परीक्षा चोख होण्याकरितां त्यांच्या भोंवतालची जागा साफसूफ करून घेणें जरूर पडलें. परीक्षेकरितां घेतलेल्या सात बखरींतून सभासदी बखर, चिटणीशी बखर व शिवदिग्विजय ह्या तीन बखरी परीक्षेकरितां प्रथम काढून घेणें जरूर आहे. कां कीं इतर बखरींतून येणा-या बहुतेक सर्व गोष्टी ह्या तीन बखरींतून आलेल्या असून, शिवाय अवांतर जास्त माहितीहि ह्या बखरींतून दिलेली आहे. तशांत सभासदी बखर समकालीन लेखकानें प्रत्यक्ष माहितीवरून लिहिलेली आहे. आणि चिटणीशी बखर व शिवदिग्विजय ह्या दोन बखरी तर त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या म्हणजे सभासदीपूर्वी होऊन गेलेल्या जुन्या कागदपत्रांच्या, बखरींच्या व टिपणांच्या आधारानें रचिलेल्या आहेत. ह्याच कारणाकरितां मल्हार रामराव चिटणीसकृत शिवाजीचें सप्तप्रकरणात्मक चरित्र व शिवदिग्विजय ह्या बखरींच्या परीक्षेला प्रथम प्रारंभ करतों व त्यांच्या अनुषंगानें इतर बखरींचेंहि पृथक्करण करितों.

ह्या दोन्ही बखरींत प्रारंभीं युधिष्ठिरापासून पिठोर राजापर्यंत वंशावळी दिल्या आहेत. युधिष्ठिरापासून पुलोमापर्यंतची वंशावळ बहुतेक विष्णुपुराणांतल्याप्रमाणें दिलेली आहे. कोठें कोठें एखाददुसरें नांव गाळलेलें आढळतें व पुष्कळ ठिकाणीं अशुद्ध नांवेंहि छापलेलीं आहेत. आधीं पुराणांतून जीं नांवे दिलेलीं असतात त्यांच्या शुद्धतेसंबंधीं रास्त संशय आलेला आहेच. तशांत ह्या बखरनविसांनीं व बखरी छापणा-यांनींहि ह्या अशुद्धतेला सहाय्य करण्याचा बराच प्रयत्न केलेला पाहून मनुष्यमात्राच्या हलगर्जीपणाची कींव येते व स्वदेशाच्या इतिहासाची जोपासना करण्याच्या कामीं दाखविलेल्या अनास्थेबद्दल तिरस्कार उत्पन्न होतो. खरें म्हटलें असतां ह्या बखरींत सृष्टीच्या उत्पत्तीपासून राजांचीं नांवें यावयाचीं; परंतु त्या नांवांची मालिका लांबच लांब असल्यामुळें व त्यांच्या संबंधी माहिती पुराणांतही विशेष नसल्यामुळें ती बहुश: दिली नसावी. युधिष्ठिराचा संपूर्ण इतिहास महाभारतांत दिला असल्याकारणानें त्या बखरनविसांनीं आपल्या इतिहासाची सुरवात युधिष्ठिराच्या नांवापासून केली आहे. कलियुगाला प्रारंभ युधिष्ठिरापासून होतो हीहि गोष्ट बखरनविसांच्या ध्यानांत असावी असें दिसतें. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें "ब्रह्मपुत्रस्य यो योनिः" व "यदेव भगवान् विष्णोः" वगैरे श्लोक, अशुद्ध कां होईनात, परंतु कसेतरी दिले आहेत, ह्यावरून व मल्हाररामराव स्वतःच तसें म्हणतो म्हणून ह्या दोघा बखरनविसांनी साक्षात् विष्णुपुराण पाहिलें होतें, ह्यांत संशय नाहीं. शिवाय "युगसंखेची याद" व "हस्तनापुरच्या राजांची याद" म्हणून ज्या बखरी प्रसिद्ध आहेत व ज्यांचा उलेख चिटणीशी बखरीच्या उपोदघातात कीर्तन्यानी केला आहे, त्याचाहि उपयोग ह्या दोघांनीं केला होता असें माझ्याजवळ ज्या युगसंख्येच्या वगैरे यादी आहेत त्यांच्याशीं ह्या बखरींतील मजकूर ताडून पाहतां, स्पष्ट दिसतें. माझ्याजवळील युगसंख्येच्या व राजांच्या यादींत सृष्टिक्रमापासून तों महमद बहादूरशहापर्यंत शके १७५९ वंशावळी आणून सोडिल्या आहेत. आद्यन्तांची थोडीफार छाटाछाट करून ह्या बखरींतहि तोच मार्ग स्विकारलेला आहे. ज्या चुका व जो घोटाळा माझ्या जवळील यादींत झालेला आहे त्याच चुका व तोच घोटाळा ह्या बखरींतून झालेला आहे. तेव्हां बखरींतील वंशावळी बहुशः ह्या यादींवरून उतरून घेतल्या आहेत हें उघड आहे व ह्या यादी बखरींच्याहून जुन्या आहेत हें त्याहून उघड आहे. ह्या यादी केव्हां लिहिल्या गेल्या त्याचा खुलासा मी पुढें करणार आहें.

युगसंख्येच्या यादींतील, व अर्थात् ह्या बखरींतील युधिष्ठिरापासून पुलोमापर्यंतच्या वंशावळी पुराणांतून घेतल्या म्हणून वर सांगितलेंच आहे. आतां शूरसेनापासून पिठोर राजापर्यंतच्या वंशावळी कोठून घेतल्या तेंहि सांगितलें पाहिजे. ह्या वंशावळी बहुशः कांहीं पुराणांतून व कांहीं रजपुताच्या राजावलींतून घेतलेल्या असाव्या असा अंदाज आहे. युधिष्ठिरापासून पिठोरराज्यापर्यंत दिलेल्या यादींसंबंधानें एक गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे, तीं ही कीं, हस्तनापूर व दिल्ली येथें राज्य करणा-या राजांचींच तेवढीं नावें देण्याचा प्रयत्न ह्या यादींत केलेला आहे. पुढल्या राजाचा मागल्या राजाशीं, पितापुत्र संबंध सदा असतोच असा प्रकार नाहीं. उदाहरणार्थ, राजा पिठोर याच्या पाठीमागच्या राजाचें नांव चनपाळ किंवा चेनपाळ असे दिलेलें आहे. हा चनपाळ अथवा चेनपाळ म्हणजे राजा अनंगपाळ होय. पिठोर चव्हाणवंशी असल्यामुळें व अनंगपाळ तुवरवंशी असल्यामुळें ह्यांचा पितापुत्र संबंध नाहीं. हाच प्रकार वंशावळींतील इतर राजांसंबंधींहि दाखवितां येईल. वंशावळींतील कित्येक राजांनीं हस्तनापूर किंवा दिल्ली येथें राज्य केलेलें आंहेच असेंहि समजतां कामा नये. यादी बनविणाराचा मुख्य हेतु सार्वभौमत्व ज्या राजांनीं केलें त्यांचींच तेवढीं नांवें दाखल करण्याचा होता.