मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

(खड ३, लेखांक१८०) येणेंप्रमाणे शपथेच्या कचाटीतून सुटल्यावर स्वामी धावडशीस येऊन सुखरूप पोहोंचला. तेथें त्याची व शाहूमहाराजांची गांठ पडली. कोंकणात झालेली सर्व हकीकत त्याने शाहूला इत्थंभूत सांगितली, व कान्होजीला छत्रपतीच्या भेटीचे साद्यंत वर्णन लिहून पाठविलें. शाहूनें आपली भेट किती मर्यादने व निष्ठेनें घेतली, ती हकीकत लिहून कान्होजीला दरडाविण्याचा स्वामींचा बेत होता. स्वामीच्या ह्या लिहिण्याचा अर्थ कान्होजी समजला व 'जो कोणी स्वामीस न मानी, तोच अविवेकी आहे', असे वरकर्ती नम्रतापूर्वक उत्तर त्यानें त्यास पाठविलें. जंजि-याचा हबशी अविवेकी, स्वामीला न मानणारा आहे, व आपण स्वतः स्वामीचे एकनिष्ठ सच्छिष्य आहों, असा हे पत्र लिहिण्यात कान्होजीचा मनोदय होता 'स्वामीने ते प्रांती जाऊन, सर्व जनांचा उद्धार करून पुन्हां आगमनाचाहि अविलंबेच विचार केला पाहिजे', असें स्तवन करून कान्होजीनें स्वामीस अगत्यपूर्वक गोंजारण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या गोंजारण्यानें स्वामीच्या हृदयांत मार्दवाचा प्रादुर्भाव न होतां कठोरपणाचाच उद्रम विशेष झाला. हत्तीमुळे पंचवीस हजार रुपयाचीं चीजवस्तू गेली, तुमच्याकडील व्याजाचा हिशेब येणेच आहे, वगैरे दुःखाच्या गोष्टी लिहिण्याचा आविर्भाव करून गेल्या दोन महिन्यातील गोष्टी आपण विसरलो नाहीं, व आपण आमचे कर्जदार आहां, हा अर्थ स्वामीनें कान्होजीस पर्यायाने लिहिला [खंड ३, लेखांक १७९]. ह्या अर्थाच्या मननानें नरम होण्याचें एकीकडेच ठेवून कान्होजीनें स्वामीची थट्टाच आरंभिली 'स्वामी तो परमहंस, सुखदुःखातीत, फलाण्यामुळे फलाणे झाले, हत्तीमुळें फलाणे गेलें, हा मोघ मनुष्यास न व्हावा यास्तव श्रुतिस्मृति प्रवर्तल्या, कोणाचें काय गेलें, व कोणी नेलें' असा शास्त्रार्थ सांगून कान्होजीनें स्वामीची निर्भर्त्सना केली. 'भटास दिली वोसरी, तों भट हातपाय पसरी' असेहि मर्मभेदक वाक्य कान्होजीने स्वामीला लिहिलें. स्वामीचें प्रस्थ दहा वीस वर्षे कोकणांत माजूं दिल्यानें स्वामी आपल्याला जुमानीनासा झाला, व दस्तकावांचून शत्रूचा माल प्रांतांतून नेऊ लागला, हा स्वामीचा अत्याचार आहे, असे ध्वनित करण्याचा कान्होजीचा हेतु होता. कान्होजीचा हेतु नीट ध्यानात न आल्यामुळें, व हत्तीच्या ह्या प्रकरणाची हास्यप्रचुर हकीकत यथास्थित उलगडतां न आल्यामुळे, कान्होजीचें हे पत्र साध्या विनोदाचे असावें, असा रा. पारसनीस यांस भास झाला (पारसनीसकृत ब्रह्मेंद्रस्वामीचे चरित्र, पृष्ठ ३३, टीप) अंगीं विशेष कर्तृत्चशक्ति, राजकारणकौशल्य व सारासार विचार नसणारीं माणसें जेव्हा कार्यकर्त्या पुरुषांच्या राजकारणात लुडबुड करू पहातात, तेव्हा त्यांच्या पदरांत जशास तशी सभवना पडल्यास त्याबद्दल यमनियमादि अष्टांगसिद्दि झालेल्या परमहंसांनीं, कान्होजीच्या म्हणण्याप्रमाणें, खरोखरीच खेद मानून घेऊं नये. परंतु हत्तीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल, दिलेल्या कर्जाबद्दल व हत्तीमुळे झालेल्या अपमानाबद्दल स्वामीला आमृत्यु किती वाईट वाटत होतें, ह्याचे दाखले स्वामीच्या अनेक पत्रांतून आहेत. [खंड३, लेखांक २९४, २९६, २९७, ३००, ३३९, पारसनीसकृत ब्र. लेखांक ३१५ ३२२, ३२८ वगैरे] हा शोक ब्रह्मेंद्रानें स्वीकारिलेल्या वृत्तीला अगदीं विसगत होता.