मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना 

९. शाहु मोंगलांच्या लष्करांतून निघाला तो स्वतंत्र एकटा असा निघाला नाही; त्यानें आपल्याबरोबर एक पातशाहि सुदर्शन घेतलें. मोंगलाच्या लष्करांतून सुटतांना स्वराज्याची पातशाही सनद शाहु आपल्याबरोबर घेऊन आला. मुख्यत: ह्या सनदेच्या जोरावर म्हणजे पादशहाचा मांडलिक ह्या नात्यानें शाहु स्वराज्याला हक्क सांगण्यास आला. वारस ह्या नात्यानें शाहूचा राज्यावर हक्क होताच. परंतु तो हक मराठमंडळांत कितपत मानला जातो ह्याचा त्याला संशय होता. व-हाडांत आल्यावर, परसोजी भोसले, चिमणाजी दामोदर, नेमाजी शिंदे, अमृतराव कदम बांडे, खंडेराव दाभाडे, बगैरे मराठे सरदारांस जहागिरीची लालुच दाखवून त्यानें वश करून घेतलें. ह्याच लालुचीला भुलून धनाजी जाधव, मानसिंग मोरे, हैबतराव निंबाळकर, वगैरे दक्षिणेकडील सरदार शाहूच्या पक्ष्याला मिळाले. १६८९ पासून १७०७ पर्यंतच्या धामधुमींत परसोजी भोसले, धनाजी जाधव, वगैरे सरदार पातशाहींतील काबीज केलेल्या प्रांतांतून स्वतंत्रपणें अधिकार करावयास व उत्पन्न खावयास शिकलेले होते. अवरंगझेब पातशहाच्या मरणानंतर ताराबाईचें राज्य निष्कंटक होऊन आपला स्वतंत्र अधिकार रहाणार नाही, अशी भीति ह्या सरदारांस वाटूं लागली व जहागिरीं देऊं करणा-या शाहूचा पक्ष स्वीकारणें त्यांस फायद्याचें दिसलें. येणेंप्रमाणें शाहूच्या येण्यापासून मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेंत दोन नवीन तत्त्वें शिरलीं:-----(१) भोसल्यांना दिल्लीच्या पातशहाचें अंकितत्च प्राप्त झालें, व (२) सरंजामी जहागिरीची पद्धत महाराष्ट्रांत व महत्तर राष्ट्रांत नव्यानेंच उद्भवली. 

१०. दमाजी थोरात, शहाजी निंबाळकर, रामचंद्रपंती अमात्य व शंक्राजी पंतसचिव वगैरे जे सरदार ताराबाईला धरून राहिले, त्यांना दिल्लीपतीचें अंकितत्व बिलकूल पसंत नव्हतें व जहागिरी मिळविण्याचीही विशेष हांव नव्हती. शिवाजीनें व राजारामानें घालून दिलेला कित्ता त्यांना सर्वस्वीं गिरवावयाचा होता. ताराबाईला व तिच्या ह्या सरदारांना यश येतें, तर शिवाजीनें स्थापिलेल्या स्वराज्याचें फारच हित होतें. परंतु शाहूला मिळालेल्या बड्या बड्या सरदारांच्या पुढें, ताराबाईसारख्या स्त्रीचें व ह्या लहान सरदारांचें तेज फारसें पडलें नाहीं; व महाराष्ट्र राज्यव्यवस्थेंत बेबंदशाहीचें बीज अप्पलपोटेपणाच्या तडाक्यांत कायमचें पेरलें गेलें. ताराबाईच्या पक्षाला मिळणारे सरदार दुहेरी कचाटींतं सांपडले. राज्याच्या ख-या वारसाविरुद्ध उठल्याचा एक आरोप त्यांच्यावर लादला जाई, व पातशाही सनदा न जुमानण्याचेंहि पाप त्यांच्या पदरीं पडे. शाहूचे बखरकार ह्या सरदाराना पुंड, बंडखोर वगैरे ज्या संज्ञा देतात, त्या ते ह्या पातशाही सनदांच्या जोरावर देतात.