मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

पै॥ छ. १ जिल्हेज                                                              लेखांक ९.                                                 
१७०१ मार्ग [१] २३३                                                     श्री.                                                    ११ डिसेंबर १७७९.

सेवेसीं विनंति ऐसीजे. आपण छ १९ जिल्कादचें पत्र पाठविलें, तें छ २६ जिल्कादीं मु।। कुसगांव प्रां। मिरज येथें पावलें. पत्रीं लिहिलें जें, सिंदे यांजकडील राजश्री त्रिंबकराव आपाजी येथें आले. त्यांची रवानगी वांईस केली. राजश्री नरसिंगराव माहुलीस गेल्याचें वर्तमान आलें. राजश्री गोविंदराव पंचमीस रविवारीं निघणार. याउपरि तुह्मीं व ते लांब लांब मजली करून सत्वर जाऊन पोहंचावें. सिंद्याकडील कारकुनास सिंद्यांनीं व आह्मीं चांगले रीतीनें सांगितलें आहे. तुह्मी व रास्त्याकडील गोविंदराव व त्रिंबकराव त्रिवर्गांचें बोलणें एक पडावें. आंत बाहेर दरज दिसूं नये ह्मणून आज्ञा. ऐसियास, सर्वत्र मंडळी माहुलीस एकत्र होऊन, मजल दरमजल मु॥ मजकुरास आलों. नवाबबहादुर यांजकडून लग्नपत्रिकेच्या थैल्या आल्या, त्या राजश्री आनंदराव वकील यासमागमें राजश्री नरसिंगराव यांणीं पाठविल्याचा मजकूर लेहून, धामणेर याचे मुकामींहून पत्र पाठविलें, तें प्रविष्ट जालेंच असेल. आज्ञेप्रो। सर्वत्रांची एकवाक्यताच आहे. तेथें गेलियावर बोलण्यांत व वर्तणुकेंत आंतबाहेर दरज दिसूं येणार नाहीं. कळावें. काल राजश्री गंगाधरराव नाना यांची भेट मौजे अनंतपूरनजीक आथणी येथें जाहाली. समागमें स्वार घ्यावयाचे ते त्याजपासून घेऊन येथें आलों. उदईक येथून कूच करून लांब लांब मजलीनें पुढें जात असों.