मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

मग आपली आई व आपण पळोन सातारास गेलो तेथून आपली आई राजगडास जिजाई आवा, शिवाजीराजाची आई, तापासी गेली, की माझे च वतन घेऊन आपले तीन खून केले, आपले पोटी एक मूल आहे, त्यास कैल दिल्हा पाहिजे ते वख्ती शिवाजीराजे बोलिले की, देसमुखी गोष्टी न करावी, कौल च आहे, देसमुखी गोष्टी न काढावी ऐसे लिहिले आपले आईपासून घेतले की पटेलगी करून असावे ऐसा कौल घेऊन, मग आपले आईने नेऊन शिवाजीराजास भेटविले त्यानी वेकाजी दत्तो याचे हाती देऊन, पटेलगी दुमाला करून, मसुरास पाठविले मसुरीची पटेलगी करीत होतो तो पुढे कितेक दिवसा शिवाजीराजे मृत्य पावले त्याचे लेक सभाजीराजे राज्य करू लागले त्यास जाऊन भेटोन अर्ज केला की, साहेबी कर्‍हाडची देसमुखी घेतली, मसूरीचे तरी देसमुखीचे वतन आपले आपले दुमाला करणे, बाज गुन्हाई माझे वतन घेऊन माझे तीन खून केले आहेत, तरी त्या खुनाचा वाटा तरी मसूरीचे वतन तरी तेवडे दुमाला करणे कर्‍हाडची नावगोष्टी काढणार नाही ऐसे लेहून दिल्हे मग सभाजीराजे मेहरबान होऊन मसूरपरगणाची देसमुखी दुमाला करावी ऐसे केले काम होऊन यावे तो एसजी फर्जद याचे हवाला देसमुखी केली मग त्याचे आर्जव करून, मग एसजी फर्जदाने अर्ज करून देसमुखी दुमाला करविली तो सवे च सभाजीराजा धरून नेला राजाराम पळोन चदीस गेला त्याचे सरदार सताजी घोरपडा व धनाजी जाधव यानी मागती एकडे ढोहणा केला मग आपण वाईस जाऊन नवाब न्याहरखान साहेबास भेटलो त्यापासून पन्नास स्वार व पन्नास प्यादे मागून घेतले व आपण काही स्वार प्यादे ठेविले आणि मसूरीचे ठाणे बळाविले ते वख्ती हजरत शाहाजादे अजमशाहा पनाळेवरी मसलतीस चालिले त्यास भेटोन इलतमेस गुदरोन अर्ज केला त्यानी हि आपले निशान-फर्मान करून दिल्हा नवाब रोहिलाखान यानी हि आपला परवाना करून दिल्हा तुळापुरी ज्याहापन्हास अर्ज करून जानसारखान फौजदार पा। खटाऊ यावरी हुकूम घेतला याउपरि सातारचे मसलतीवरी सर्जाखान आले त्यानी सातारास वेढा घातला न्याहारखानाचे वाईचे ठाणे तहगीर जाहाले. तेव्हा मसूरीचे हि व रहिमतपुरी होते ते हि उठोन गेलें मग सर्जाखानास जाऊन भेटोन, सर्जाखानाचे पन्नास स्वार व पन्नास प्यादे व त्यापासी शेख अजमतुला ह्मणौन ठाणेदार मागोन घेतला ते वख्ती सताजी घोरपडा व धनाजी जाधव येऊन साताराचा वेढा उठविला सर्जाखान सुटोन आले गनीमाने मसुरास वेढा घातला ठाणेदार राती करून निघोन गेला वाई, बुध व खटाऊ ऐसी ठाणी टाकून गेले कोठे आसिरा नाहीसारिखा जाहाला बिन आसिराविण आठ रोज गाव भाडविला मग त्याचा कौल घेऊन त्यास भेटलो त्यानी धरून वसतगडास गेले नागवण बाधिली मग आपला लेक सुभानजी हा त्यापासी कैल ठेवून सुटोन आलो. पैका देवयास तारा नाही ह्मणौन चदीस राजारामापासी गेला त्याचे आर्जव करून लेकाची सुटका केली आणि देसमुखी दुमाला करून घेतली फिरोन माघारी आलो आपली देसमुखी करीत असता, धनाजी जाधव याचे निसबतीचे पदाजी व पिराजी यादव याचे लेक व हे हजारी पचहजारी चाकर होते यानी व धनाजी जाधवाने मागती आपणासी कथळा केला मग आपण नवाब हमीमुद्दीखान याकडे खटावास जाऊन अर्ज केला त्यानी हजूर लेहून रा। मबाजीपत राजे याचे ठाणे दिल्हे मग मसूरीची गढी तयार करून गनीम जेरजफत करून ठाणा होतो मग हजरत अलमगीर साहेब मिरजेस आले सातारावेरी मोहीम केली