Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

प्रस्तावना

१३. नारायणराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील पत्रे थोडीं म्हणजे फक्त ४ आहेत. माधवराव नारायणाच्या कारकीर्दीतील पत्रे ३०२ आहेत. पैकीं पत्रांक २७४ पर्यंतचीं पत्रें रघुनाथरावदादांच्या संस्थानद्रोहाच्या हकीकतीनें भरलीं आहेत. शक १६८३ पासून शक १७०४ पर्यंत जीं २१ वर्षे गेली, त्यांचा इतिहास म्हणजे रघुनाथरावदादांच्या संस्थानद्रोहाचा इतिहास. त्याची समाप्ति पत्रांक २७४ त झाली आहे. रघुनाथरावाच्या द्रोहाचा सांसर्गिक झटका गायकवाड, पटवर्धन, भोसले, होळकर, शिंदे, कोल्हापूरकर वगैरे अनेक सरदारांस बसल्या कारणानें पत्रांक २७४ पर्यंतच्या पत्रांत ह्या सरदारांच्याहि संस्थानद्रोहाची हकीकत आलेली आहे. शक १७०४ पासून शक १७१८ पर्यंतची म्हणजे सवाई माधवरावांच्या मृत्यूपर्यंतचीं पत्रे आहेत, त्यांत, सर्वं मराठा सरदारांचें एकीकरण करण्याचा जो नाना फडणिसानें प्रयत्न केला, त्याची हकीकत पहावयास सांपडेल. ह्या एकीकरणाच्या हकीकतीची समाप्ति पत्रांक ४१५ त झाली आहे. तद्नंतर रावबाजींच्या कारकीर्दीचीं पत्रे लागतात. त्यात बाजीरावाचा कमकुवतपणा, सरदारांचा द्रोह, पेंढा-यांचे दंगे, स्त्रियांची नागवण, व लोकांची दैना, ह्यांचीं वर्णनें वाचावयास मिळतील. शक १६८३ पासून रघुनाथराव व गोपाळराव यांनीं जो संस्थानद्रोह सुरू केला व ज्याचें पारिपत्य यथास्थित झालें नाहीं, ती परिपाकास येऊन सत्ताधीश, सरदार, सामान्य प्रजा, स्त्रिया, व धर्माधिकारी यांस कसा भोंवला, तें शक १७२२, शक १७२३ व शक १७२४ या तीन सालांतील पत्रांवरून तपशीलवार कळेल. स्वतंत्र संस्थान म्हणजे काय वा संस्थानद्रोह म्हणजे काय, स्वसंस्थानाला सोडून, शत्रूची सेवा करणें म्हणजे केवढें पातक आहे, प्रत्येक जाणत्या माणसाला राजकीय भावना किती जाज्वल्य असली पाहिजे, वगैरे गोष्टी ज्या वाचकांना माहीत असतील, ते ह्या तीन सालांतील पत्रांचे बहुत मनन करतील. शक १७२४ नंतरची रावबाजीच्या कारकीर्दीतील पत्रें आपापली हकीकत सांगतच आहेत. तेव्हां त्यासंबंधानें येथें जास्त लिहीत नाहीं.