स्थलनामव्युत्पत्तिकोश

सबंद महाराष्ट्रांतून ही नाणेंमावळाची तर्फ अभ्यासा करितां अशा करितां घेतली कीं, दंडकारण्याचा हा तीन हजार वर्षांपूर्वी केवळ निर्भेळ गाभा होता असा माझा पूर्व समज आहे. व-हाड, नागपूर, उत्तर कोंकण, आंध्र देश, गोदातीर, ह्या दंडकारण्याच्या परिसरा वरील भूमि असल्यामुळे, ह्यांत आर्यांची वसाहत प्रथम झाली. हा मावळ प्रांत अरण्याच्या अगदीं गाभ्यांत व सह्यपर्वताच्या कुहरांत असल्या मुळे, ह्यांत वसाहती ब-चा च उशिरां झाल्या असाव्यात, असा मी पूर्व तर्क करतों. ह्या रानांत जर आर्यांच्या पूर्वी कोणी लोक असतील, तर त्यांची कांहीं तरी खूण अवशेष ह्मणून एथील गांवें, डोंगर, नद्या, नाले, यांच्या नांवांत अल्पस्वल्प तरी सांपडल्या वांचून सहसा राहूं नये. पैकीं गांवांच्या नांवांत कांहीं खूण सांपडते कीं कसें त्याचा प्रस्तुत विवेचनांत अभ्यास आरंभिला आहे. नाणेंमावळांत एकंदर गांवें १६८. पैकीं १६७ ची संस्कृत नांवें वरील यादीत दिलीं आहेत. एका ग्रामनामाचें तेवढें संस्कृत रूप ओळखतां आलें नाही. तें ग्रामनाम ताजें. हें संस्कृतोत्पन्न आहे ह्या बद्दल मला संशय नाहीं. इतकें च कीं, तें नक्की काय असावें, याचा निश्चय अद्याप झाला नाही. इतर प्रांतांतील ग्रामनामांचा अभ्यास करतांना, ह्या नामाची व्युत्पत्ति सुटेल. १६७ नांवां पैकी बरोबर ५० नांवें वृक्ष व वनस्पती यांच्या संस्कृत नांवां वरून वसाहतवाल्यांना सुचलेली दिसतात. त्या त्या स्थलीं त्या त्या वनस्पतीच्या वैपुल्या वरून तीं तीं नांवें सुचावीत, हें साहजिक आहे. नदी, संगम, पत्थर, डोंगर, माळ, दही, दूध, खिंड, वगैरें वरून ७८ नांवें दिलेलीं आढळतात. लोक, जाती, गोत्रें, व व्यक्ति यांच्या वरून १७ नांवें दिलेलीं आहेत. बौद्धांच्या संसर्गानें १२ नांवें पडलीं. आणि तत्कालीन आर्य राजांच्या संबंधानें १० नांवें निष्पन्न झालेली दिसतात. पैकीं- राज्यसंस्था उद्भवल्या वर राजसंबंधक १० नांवें अस्तित्वांत आलीं व बौद्धधर्माचा ह्या प्रदेशांत प्रसार झाल्यावर बौद्धसंबंधक १२ नांवें प्रचलित झालीं, हें उघड आहे. राजाच्या राजधानीला पाटण (पट्टण, पत्तन) हें नांव असे. सध्यां जशीं नगर, शहर, The City हीं नांवें वैशिष्ट्यानें राजधानीला देतात, तो च प्रकार त्या काली हि होता. देवघर (देवगृह, राजगृह) हें नांव राजाच्या आवडल्या खास वसतीच्या गांवाला होतें. देवघर हें नांव महाराष्ट्रांत व कोंकणांत त्या कालीं असणा-या संस्थानिकांच्या खास गांवांना असलेलें आढळतें. राजसंबंधक १० नांवें नाणेंमावळांतील हीं:-( १ ) पाटण, (२) देवघर, (३) देवळे, (४) शिरवतें, (५) कान्हें, ( ६) राजपुरी, (७) मंगरूळ, (८) वहाणगांव, (९) शिरगांव, व (१०) खडकाळें. खडकी, खडकाळें, कडें, हीं नांवें राजाच्या कटकस्थानाला असत. पाणिनीच्या नंतर बौद्धधर्माचा प्रसार झाल्या वर त्याचा संसर्ग नाणेंमावळाला हि शका पूर्वी दोन तीन शें वर्षे झाला. त्याची खूण खालील १२ गांवांच्या नांवांत सांपडते. तीं बारा गांवें हीं:- (१) वेहेरगांव, (२) थुगांव, (३) करंडोल, (४) माणकोली, (५) सदापूर (६) नाणें, (७) वाडिवळे, (८) बुधवडी, (९) नाणोली, ( १०) पुसाणें, ( ११) नाणोली चाकण, ( १२ ) बुधेलें. सोमठणें, वडेश्वर, शिरवतें (श्रीप्रस्थ ), शिरगांव (श्रीग्राम ) ह्या ग्रामनामां वरून दिसतें कीं, सनातनधर्म नाणेंमावळांत असून, शिवाय बौद्धधर्माची छाया ह्या मावळावर बरी च दाट पडली होती. लोक, जाती, गोत्रें व व्यक्ति यांच्या वरून खालील ग्रामनामें साधिलेलीं आहेतः- (१) अहीरवडें, (२) राकसवाडी, (३) परंदवडी, (४) नागाथली, (५) अंध्राव, ( ६) टाकवें, (७) नागरगांव, (८) धालेवाडी, (९) कुरवंडें, (१०) नेसावें, (११) नवलाख उंबरें (१२) भाजें, (१३) भाजगांव, (१४) माळेगांव, (१५) भडवली, (१६) कान्हें, (१७) सिंदगांव. पैकीं धाळेवाडी, माळेगांव, भडवली व सिंदगांव, हीं चार ग्रामनामें ढाले, भल्‍ल, भट व सिंद या चार क्षत्रियांच्या कुळांवरून पडलेलीं आहेत. भाजें व भाजगांव हीं दोन नांवें ( आंध्र) मृत्य ह्या शब्दा वरून निघाललीं दिसतात. आंध्रमृत्यांचें राज्य ह्या प्रदेशा वर असतांना हीं नांवें पडलेलीं असावींत. अंध्राव हें नांव अंध्रवह किंवा आंध्रवह ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. अर्थात हें हि नांव अंध्रांनीं दिलेलें असावें. एथील जवळच्या एका नदीचें व तर्फेचें हि नांव अंध्रा व अंधर ( अंदर) मावळ असें आहे. सारांश, बौद्धांच्या प्रमाणें अंध्राच्या संबंधाची हि खूण ह्या तर्फेतील ग्रामनामांत आढळते. अहीरवडें ह्या नांवांत अभीर लोकांचा उद्धार झालेला आहे. अर्थात, त्या कालीं ह्या तर्फेतील एका गांवांत तरी अभीरांची वसती होती असें हाणावें लागतें.