व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश

स्मिथनें Sacred हा अर्थ कित्येक यूरोपीयन राजांच्या बिरुदावळीच्या उपमानांवरून काढिलेला आहे. इंग्लंडचे राजे आपणास धर्माचे व संस्थानाचे मुख्य समजतात व स्वतःस Sacred, High, Gracious वगैरे बिरुदें लावितात. तोच प्रकार अशोकानें केला असावा, असें स्मिथला वाटलें इतकेंच. परंतु स्मिथनें एकच गोष्ट ध्यानांत घ्यावयाची होती, ती ही कीं, इंग्लडांतल्याप्रमाणें भारतवर्षात धर्माचें आदिस्थान राजाच्या ठायीं कधीं हि व कोणीं हि मानिलेलें नाहीं. धर्माचें आदिस्थान भारतवर्षात फार पुरातन कालापासून वेदादिग्रंथांच्या व त्यांचा आशय सांगणार्‍या धर्मगुरूंच्या ठायीं अधिष्ठापिलेलें आहे. इंग्लंडांतल्याप्रमाणें भारतवर्षांत धर्म हा राजाचा अंकित नाही; राजा धर्माचा अंकित आहे. भारतवर्षांत वस्तुतः राज्य कोणाचें ? तर धर्माचें. मोठमोठ्या राजांच्या व महान् महान् महंताच्या अशा उक्ती आहेत कीं, भारतवर्षात धर्मराज्य आहे. या धर्मराज्याचीं, पुरोहित, राजा, अमात्य, दुर्ग, बल, कोश वगैरे अंगें आहेत. म्हणजे भारतवर्षात राजा हा धर्मराज्याचें एक अंग आहे. इंग्लंडांतल्याप्रमाणें धर्माच्या वरती अधिकार करणारा नाहीं. तेव्हां, स्मिथ् म्हणतो त्या अर्थानें Sacred हें विशेषण अशोक आपणा स्वतःला खुळ्यासारखा लावील, हें बिलकुल संभवत नाहीं. आपण देवांचे किंवा देवांना लाडके आहोंत, असें अशोक स्पष्ट म्हणतो. ह्या [ १० म्हणण्याचा आशय काय ? इतर माणसें काय देवांचीं लाडकीं नाहींत कीं अशोकानेंच तेवढी आपल्या लाडकेपणाची फुशारकी मिरवावी ? तर तसें नाहीं. अशी फुशारकी अशोक मिरवीत नाहीं. अशोक एका वैदिक संप्रदायाला अनुसरून हे शब्द वापरीत आहे. भारतीय आर्यकुलांत फार पुरातन कालापासून असा एक संप्रदाय आहे कीं, आपलें पाळण्यांतील खरें नांव कोण्या हि आर्यानें प्रकट करूं नये; एखाद्या टोपण नांवानें आपली प्रथा करावी किंवा निदान मूळ नांवांत थोडा तरी फेरबदल करून मग तें प्रकट करावें. ह्याविषयीं सूत्रांतून स्पष्ट उल्लेख आहेत व हिंदुस्थानांत हा संप्रदाय अद्याप हि विद्यमान आहे. ऐतरेयोपनिपदाच्या तृतीय खंडाच्या शेवटीं ह्या पुरातन संप्रदायाचें एक नामांकित उदाहरणा दिलें आहे. त्याला ब्रह्म दिसलें. तेव्हां इदं अदर्शम् असे उद्गार दानें काढिले. हा उद्गारांवरून त्याचें नांव इदंद्र असें पडलें. त्या इदंद्राला परोक्षत्वानें सर्व देव इंद्र असें म्हणूं लागले. कां कीं, देव परोक्षप्रिय आहेत. प्रत्यक्ष जें इदंद्र हें अक्षरत्रयात्मक नांव तें परोक्षप्रिय देवांना आवडलें नहीं, एतदर्थ त्यांनीं इंद्र हें अक्षरद्वयात्मक परोक्ष नांव पसंत केलें. " तं इदंद्रं सन्तं इंद्र इति आचक्षते परोक्षेण, परोक्षप्रिया इव हि देवाः ।” ह्यांत, देव हे परोक्षप्रिय आहेत, ही गोष्ट प्रामुख्यानें लक्ष्यांत ठेवावयाची आहे. पशू जे आहेत तें प्रत्यक्षप्रिय असतात. म्हणजे इंद्रियांना जें सहज गोचर होईल तें पशूंना किंवा पशुतुल्य द्विपादांना पसंत किंवा प्रिय होतें. परंतु जे देव आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांना परोक्ष जें अनुमानादिप्रमाणजन्य ज्ञान तें प्रिय असतें. असे जे परोक्षप्रिय देव त्यांनीं इदंद्र हें जें प्रत्यक्ष नांव त्यांत फेरबदल करून इंद्र असें परोक्ष नामाभिधान पसंत केलें, आतां अशोकाच्या शिलाशासनांतील देवानं प्रिय पियदसी राजा या शब्दांत हा पुरातन संप्रदाय कसा प्रतीत होतो तें पहा. अशोकाचें मूळ पाळण्यांतील नांव अशोक. हें प्रत्यक्ष नांव स्वत: उच्चारणें किंवा योजणें पुरातन संप्रदायाच्या विरुद्ध. सबब, पियदसि ह्या परोक्ष नांवाचा अशोकानें उपयोग केला आहे. उपयोग करतांना असा परोक्ष नांवाचा उपयोग कां केला तें हि अशोक देवानंपिय ह्या शब्दांनीं व्यंजीत आहे. देवानां म्हणजे 'परोक्षप्रियाणां प्रियः अहं, असे अशोक व्यंजीत अहे. परोक्षप्रिय जे देव त्यांचा प्रिय जो परोक्ष नांवानें प्रथित पियदसि राजा तो असा हुकूम करतो इ. इ. इ. शिलाशासनांत अशोक असें नांव अशोकानें कोठे हि कोरवलेलें नाहीं; पियदसि हें परोक्ष नांव च तो स्वतः सदा योजीत असे. कारण, तसा संप्रदाय भारतवर्षांत फार प्राचीन काळापासून होता. तात्पर्य, प्रियदर्शिन्, पियदसी, हें अशोकाचें परोक्ष नांव आहे. स्मिथ् म्हणतो त्याप्रमाणें पियदसि ह्या शब्दाचा अर्थ gracious असा नाहीं. मूळीं हें विशेषण नाहीं. हें विशेषनाम आहे. दीपवंशांत अशोकाला पियदसि ह्या च नांवानें उल्लेखिलेलें आहे. दीपवंशांत असा प्रयोग व प्रकार झालला आहे, हें हि स्मिथ् विसरला आहे व अज्ञानानें gracious असें भाषान्तर करता झाला आहे.