जातिनामव्युत्पत्तिकोश

कारावर ( चांभार) - निषादापासून वैदेहीच्या (वैश्यापासून ब्राह्मणीचे ठायीं झालेल्या स्त्रीच्या ) ठाई झालेला तो कारावर. लोककार, कांस्यकार, चर्मकार, रथकार, सुवर्णकार ह्या शब्दांत कार हें जें पद आहे त्याचा अर्थ शिल्पी असा आहे. कारावर ह्या शब्दांतील कार ह्या पदाचा अर्थ शिल्पी असाच आहे. कारणां शिल्पिनां अवरः कनिष्ठः नीचः कारावरः । कारांत म्हणजे शिल्पांत जो अत्यंत गलिच्छ धंदा करणारा तो कारावरकारावरो निषादात्तु चर्मकारः प्रसूयते ( मनुस्मृति अध्याय १०, श्लोक ३६) चामड्याचे शिल्प करणारा.
(राजवाडे लेखसंग्रह भा. २ अंत्यजोद्धार पृ. १३३)

कुणबी [ कुलपति = कुळवइ = कुळवी = कुणबी ] कुणबी म्हणजे शूद्र नव्हे. कुणबी म्हणजे जमीन करणारा. (रा. मा. वि. चंपू पृ. १९३)

कुळंबी - मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायांतील ११९ वा श्लोक व त्याची कुल्लूकव्याख्या अशी आहे:-
दशी कुलं तु भुंजीत विंशी पंच कुलानि च ।
ग्रामं ग्रामशताध्यक्षः सहस्राधिपतिः पुरम् ॥ ११९

“ अष्टागवं धर्महलं षड्गवं जीवितार्थिनां । चतुर्गवं गृहस्थानां त्रिगवं ब्रह्मघातिनां " इति हारितस्मरणात् षड्गवं मध्यमं हलं इति तथाविधहलद्वयेन यावती भूमिर्वाह्यते तत्कुलं इति वदति । तद्दशग्रामाधिपतिर्वत्त्यर्थं भुंजीत । एवं विंशत्यधिपतिः पंच कुलानि शताधिपतिर्मध्यमं ग्रामं सहस्राधिपतिर्मध्यमं पुरम् ॥ ११९ ॥

एकेक नांगर साहा बैलांनीं ओढावा; अशा नांगराला षड्गव नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाते तेवढीला कुल अशी संज्ञा आहे. अशी कुल्लूकभट्टांनी कुल ह्या शब्दाची शक्ति सांगितली. तात्पर्य, कुल व वाहणें हे दोन शब्द मनुसंहितेपासून किंवा तत्पूर्वीपासून भारतवर्षात प्रचलित आहेत. सहा बैलांनी जेवढी जमीन नांगरली व वाहिली जाते तिचें नांव कुल. ह्या कुल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कुळ असा होतो. कुल शब्द जसा संस्कृतांत नपुंसकलिंगी आहे तसाच कुळ शब्द मराठींत नपुंसकलिंगी आहे. लहानशा खेड्यांतील लागवडीखालील जमीन पांच सहा कुळे असते व मोठ्या गांवांत पांचपंचवीस कुळें असते. एकेका कुलाचा म्ह. सहा बैलांनीं वाहिल्या जाणार्‍या जमिनीचा जो कर्द्या त्याचें नांव कुलपति. कुलपति ह्या संस्कृत शब्दाचें महाराष्ट्री रूप कुलवइ; आणि कुलवइ ह्या महाराष्ट्री शब्दाचें मराठी रूप प्रथमारंभीं कुळवी व नंतर कुणबी. ह्या शब्दाचे कुळंबी, कुनबी असेहि अपभ्रंश सध्यां आहेत. पूर्वी कुणबी ही जात नव्हती, केवळ धंदा होता. तो सध्यां जात झाला आहे. प्रायः शूद्र जमीन वाहतात; म्हणून शुद्रांना सध्यां कुणबी अशी संज्ञा महाराष्ट्रांत प्राप्त झाली आहे. जमीन वाहणारा जर मराठा क्षत्रिय किंवा धनगर किंवा महार किंवा कुंभार असेल तर सरकार किंवा सावकार त्या मराठ्याला किंवा धनगराला किंवा महाराला किंवा कुंभाराला आपलें कुळ म्हणतात. कुळें दोन प्रकारचीं-मिराशी किंवा उपरि. वंशपरंपरेनें जमीन वाहणारी जीं तीं मिराशी व एका मोसमापुर्ते जमीन वाहणारी जीं ती उपरि. सारांश, कुलपति, कुलवइ, कुळवी, कुणबी, कुळंबी हा शब्द फार पुरातन आहे. (भा. इ. १८३२)