[२३१]                                      ।। श्री ।।            १७ आगष्ट १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. सरकारांत तोफखान्याकडे बैलाचें प्रयोजन जरूर फारच आहे. याविषयीं पेशजी तुह्मांस लिहिलें आहेच. परंतु प्रस्तुत फार निकड आहे. पावसामुळें तोफखान्याचे बैल खराब जाहले, मरतात. यास्तव तुमचा तालुका विटावे वगैरे जवळ आहे. येथील तूर्त पांचशें बैल सत्वर जमा करून हुजूर पाठविणें. येविषयीं दिरंग लागावयाचें काम नाहीं. तरी लौकर बैल चांगले, मजबूत, गाड्याचे कामाचे ऐसे रवाना करणें. जे जे जमा होतील तितकेच जलदीनें रवाना करीत जाणें. बैलाविणें खोळंबा झाला आहे. हें ध्यानांत आणून लौकर पाठविणें. विलंब न करणें. +अबदालीची फौज कांहीं फुटून येणार. त्यांचा करार तुह्माजवळ जमा व्हावें. एक लाख खर्चास देऊन इकडे आणावें. यांत फौजहि फुटते. येथेंच आल्या लढाईंत वसवास राहतो. यास्तव याप्रें॥ केलें आहे. जे येतील ते तुह्मास पत्र घेऊन येतील. त्यांस आपलेजवळ जमा करणें. रसद बाकी एकूण वीसपंचवीस लाख जरूर तरतूद, तूर्त सत्वर कांहीं, निमे पुढें पाठवणें. त्या वारंवार न लिहिणें रा॥ छ ५ मोहरम. बहुत काय लिहिणें. हे विनंति.