Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

 .स्थलसंबंधक माहिती ही ह्या बखरींत अशी च पूर्णपणें विश्वसनीय आहे. घणदिवी पासून चेऊल पर्यंतच्या समुद्रकिना-याच्या लगतच्या गांवांचा जो निर्देश बखरींत केलेला आहे तो नकाशा वरून पडताळून पहातां त्यांत विसंगतता बिलकुल नाहीं. प्रस्तुत बखरींत वर्णिलेल्या हालचालींचा प्रांत पश्चिमसमुद्रकिना-या पासून पूर्वे कडे सुमारे पंधरा वीस मैल रुंदीच्या आंत बाहेरचा आहे. कांहीं प्रांतांचीं व गांवांचीं नांवें महाराष्ट्र व गुजराथ ह्या बाहेरच्या देशांतील असून, कांहीं गांवांचीं नांवें उत्तर हिंदुस्थानांतील आहेत. तपशीलवार खुलाशा करितां गावांचीं, प्रांतांचीं, नद्यांचीं व किल्ल्यांचीं जीं नांवें बखरींच्या गद्य भागांत आलेलीं आहेत त्यांची याद अकारविल्ह्यानें खाली देतों-- (खालील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ह्या तीन शें शहाण्णव नांवां पैकीं नक्षत्रचिन्हांकित नांवें उत्तरकोंकणा बाहेरील गांवांचीं व देशांचीं आहेत. बाकीं राहिलेलीं ३३६ नांवें उत्तरकोंकणांतल्या महिकावतीच्या राज्यांतील गांवें, नद्या, तळीं, तीर्थे व डोंगर यांचीं आहेत.

१०. काल व स्थल हीं जीं ऐतिहासिक प्रसंगांच्या घटनेंतील दोन अंगे त्यांच्या विश्वसनीयत्वा संबंधानें विचक्षणा झाल्या वर, प्रसंगघटनेचें जें तिसरें अंग व्यक्ति तत्संबंधी प्राह्याग्राह्यतेच्या विचाराचा प्रांत लागतो. बखरीच्या गद्यभागांत (१) बिंबराजांची व नागरशाची हकीकत, (२) यादवांची हकीकत, (३) नायत्या राजांची हकीकत, (४) अमदाबादेच्या मुसुलमान पातशाहांची हकीकत, (५) पोर्तुगीजांची हकीकत, (६) रामनगरचा त्रोटक उल्लेख, (७) पट्ट्याचा त्रोटक उल्लेख, (८) देसाई, चौधरी, पाटील वगैरे अधिका-यांच्या मानापमानांची हकीकत, (९) पाठारे ऊर्फ पातेणे प्रभूंची हकीकत, व (१०) मनोर व मालाड ह्या महालांच्या उत्पन्नाची वगत, अश्या एकंदर दहा हकीकती दिल्या आहेत. त्यांत जीं व्यक्तिनामें आलीं आहेत, तीं सर्व उत्तरकोंकणांत शक १०६० पासून शक १४२२ पर्यंत वावरणा-या व्यक्तींचीं आहेत, त्यांत कल्पित कादंबरीवजा भाकडकथेंतील नांवा प्रमाणें काल्पनिक नांवें बिलकुल नाहींत. कथाभागाच्या ओघांत हीं नांवें जेथे जशीं यावीं तशीं च आलेलीं आहेत. त्या वरून खात्री होते कीं त्या त्या व्यक्ति त्या त्या कालीं व त्या त्या स्थलीं खरोखर च वावरत होत्या. निरनिराळ्या प्रसंगांच्या अनुरोधानें निरनिराळ्या काळीं निरनिराळीं चार प्रकरणें भिन्न भिन्न लेखकांनीं मूळांत लिहिलीं होतीं. तीं एकत्र करून व त्यांना दोन पद्य उपोद्घात जोडून, भगवान् दत्त नामें करून कोण्या इसमानें ही सबंद बखर निर्माण केली. प्रस्तावनांत भगवान् दत्त याणें मूळच्या चार गद्य प्रकरणांना पौराणिक राजावलींच्या ज्या दोन पद्य प्रभावळी बसविल्या, त्यांतील पौराणिक कथाभागाशी सध्यां आपणास कांहीं एक कर्तव्य नाहीं. त्यांतील प्राह्याग्राह्यतेची चिकित्सा अवकाश सांपडल्यास पुढें करतां येईल. सध्यां एवढें च सांगावयाचें आहे कीं मूळच्या चार गद्य प्रकरणांत भगवान् दत्त याणें कोणत्या हि प्रकारची ढवळाढवळ केलेली नाहीं. जशीं प्रकरणें हातीं आलीं तशीं चीं तशीं तीं भगवान् दत्तानें संकलित गद्यपद्य बखरींत गोंवून दिलीं. काल, स्थल, व्यक्ति, व तपशिल ह्यांत फिरवाफिरव काडीची हि केली नाहीं. बिंब राजांची किंवा यादवांची किंवा देसायांची किंवा पाठा-यांची तरफदारी करण्याचा अभिलाष भगवान् दत्त याला कोणता व असलेला दृष्टीस पडत नाहीं. उत्तरकोकणांत सवितावंशीय, सोमवंशीय व शेषवंशीय कुळांची पूर्वपीठिका काय होती, ती जाणण्याचा धार्मिक व सामाजिक हव्यास भगवान् दत्त याला होता असें दिसतें. राजांचीं भांडणें व राज्यांच्या उलथापालथी सर्वत्र कश्या होतात व उत्तरकोकणांत कश्या झाल्या, ह्या राजकीय बाबी कडे भगवान् दत्ताचें तितकें लक्ष्य नव्हतें. उत्तर कोकणांतील जातीजातींत वरिष्ट कोण, कनिष्ट कोण, ही सामाजिक व धार्मिक बाब जाणण्याच्या इच्छेनें दत्तानें हा संकलनाचा उद्योग केला आहे. भगवान् दत्तानें आपल्या पद्य प्रस्तावनेला वंशविवंचनकथा असें अन्वर्थक अभिधान दिलेलें पाहिलें, म्हणजे प्रकरणांचें संकलन करण्यांत त्याचा मूळ, मुख्य व एक च एक हेतू कोणता होता तें स्पष्टपणें नि:संदिग्ध होतें. भगवान् दत्ताचा हेतू हा असा धार्मिक व सामाजिक असल्या मुळें, मूळच्या चार प्रकरणांतील काल, स्थल व राजकीय व्यक्ति ह्यांच्या मध्यें घोटाळा उडवून देण्याच्या मोहास भगवान् दत्त बळी पडला नाहीं. भगवान् दत्ता प्रमाणें च केशवाचार्याचा हि हेतू धार्मिक व सामाजिक होता, राजकीय नव्हता. म्लेच्छार्णव होऊन, ज्ञात, धर्म व आचार बुडून गेला, सबब नायकोरावाच्या साहाय्यानें केशवाचार्यानें उत्तरकोंकणांतील म्हणजे महिकावती प्रांतांतील अठरा खूम जातीस ज्ञात, धर्म व आचार यांचें निरूपण केलें.