हत्तीविशीं बहुत कांहीं अर्ज केला. परंतु हत्ती महाराजांनी दिला नाहीं. मग तेथें खट्टे होऊन हत्ती महाराजांस देऊन, निरोप घेऊन, अष्टेस आलेवर, विठोजी चव्हाण गोटखिंडींत महाराजांनी कांही सरंजाम देऊन ठेविले होते ते अष्टेस येऊन, येसबांनी व चव्हाणांनी मनसबा केला जे, याउपरी या राज्यांत राहूं नये, संभाजी महाराज यांचे चाकर व्हावें. ऐसा विचार करून पन्हाळियासी महाराजांकडे राजकारण आपा प्रतिनिधी याचे विद्यमानें केलेवरी, प्रतिनिधी अष्टेस येऊन येसबाव व विठोजी चव्हाण यासी घेऊन गेले. महाराजांचे दर्शन जाहलें. येसबास सेना खासखील किताब देऊन, नवा लक्षांची दौलत विजापूर प्रांतें दिली. विठोजी चव्हाण यासी पन्हाळेपासोन सातारेपावेतों सरंजाम दिला. आपले बाप शिदोजी थोरात पुन्हा येळावींत येऊन राहिले. पूर्ववत् सरंजाम करार महाराजांनीं करून दिला. ऐसे एक वरीस होते. येसबा विजापूर प्रांती गेले. विठोज चव्हाण पन्हाळेस राहिले. सातारेपावेतों ढोणा जाहला. तेव्हा थोरले पंतप्रधान दिल्लीहून सातारेस आलेवर, महाराजांनी दक्षण प्रांती मोहीम सांगितली. हें वर्तमान ऐकून येसबा अष्टेस आले. तंव पुढें, रावप्रधान फौजा घेऊन दुसरे रोजी अष्टेस गांठ घालावी या विचारें निघोन आले. हें वर्तमान येसबास कळतांच रातोरात ठाणेंत कांही लोक ठेऊन पन्हाळेस मुलोंमाणसें घेऊन गेले. आपले तीर्थरूप दुसरे दिवशीं फौज अष्टेस दाखल जाहलेवर येळावीहून निघोन पन्हाळेस गेले. आपण व आपले भाऊ लहान होतो. निघोन जावयासी फुरसत नाहीं. मग भिलवडींत आमचे मातोश्रीस ठेविलें. तेथें लपोन होतों. तेव्हां लष्कर अवघें जमा अष्टेवर जाहालें. थोरले पंतप्रधान व पंत मंत्री ऐसे हेही मानोन आलेवर, कोणी चहाडी करोन आपले मातोश्रीस व आपणास भिलवडीहून लष्करास धरून आणून राजश्री पिलाजी जाधव यांचे स्वाधीन केलें. त्यांनी कैदेतच ठेविलें. तेथून लष्कर जाऊन कोल्हापुरास वेढा घातला. एक रोज पन्हाळेवर चालोन येत असतां येसबाचे फौजेस गांठ पडली, युध्द जाहालें, येसबास भाला लागला, तेंच जखमेनें मृत्यु पावले. आपले तीर्थरूप आपले जमावानिशी जवळच होते. येसबाचे पोटीं संतान नाहीं. धाकटे भाऊ चौघे होते. ती लहान मुलें. त्यांची मातोश्री सईजी आवा होती. नायकीस आव पडे ऐसे कोणी नव्हते. आणि विठोजी चव्हाण यांसी दावा लागला असे, ऐसी संध पडली. येसबाची बायको गोडाबाई होती, तिनें सहगमन केलें.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57