तुह्मांस दुसरी देऊं ऐसें सांगून पाठविलें. मग आपले बाप बहुत अजूरदे होऊन तिघा भावांपाशीं व वडील बापही होते त्यांजपाशीं हा मजकूर सांगितला. तेव्हां त्यांनीं सांगितले कीं, तुह्मीं वडील भावाशीं अमर्यादा करावीशी नाहीं, तरवार आपले घरींच आहे, बाहीर कोठें गेली नाहीं, आह्मी भाऊ अवघे त्याचे मर्यादिंत आहों, तंव नायकीस आब आहे. नाहींतरी घरकलहानें अपाय होईल. ऐसें सांगितलेवर आपले बापांनीं गोष्टी मान्य केली. आणि बाहीर चाकरीस जाऊन सचंतर आपलें जितरब मिळविलें. सुभानजीबावा आष्टेंत नांदत असतां निधन पावलें. तेव्हां त्यांचे पुत्र यशवंतराव थोरात जवळ होते, त्यांनीं सर्व अंगेजणी नायकीची केली. कृष्णाजी बावास जवळ ठेवून घेतलें. सूर्याजी बावाही बाहेर पाटीलकी करावयास राहिले. फिरंगोजी थोरात बोरगांवीं राहिलें. आपले बापांनीं नारोपंत घोरपडे यांची चाकरी कबूल केली. त्यांनीं मिरज प्रांते सरंजाम दिला, आणि येळावी राहावयासी जागा दिल्हा. तेथें येऊन राहिले. शेंपन्नास प्यादे व तीस चाळीस राऊत करून आपलें पोट भरीत होते. येसबा अष्टेमध्यें होते. तेव्हां कऱ्हाडीं व मिरजेंत मोंगलांची ठाणीं होतीं. मुलुख गैरकबजी होता. पुढें येसबाचा व संभाजी महाराज यांचा बेबनाव जाहला. तेव्हां त्यांची चाकरी सोडून, महाराज छत्रपती सातारा होते त्यांस येऊन भेटले. आपले बापासही बरोबर येणें ह्मणून बहुतसा आग्रह केला, परंतु त्यांचे विचारास गोष्ट न आली. हे संभाजी महाराज यांचे राज्यांत घोरपडयांचे चाकर ह्मणून जैसे होते तैसेच राहिले. ऐसें वरीस एक होते. तंव पुढें थोरले पंतप्रधान यांनीं सैदाचा तह केला, तेव्हां भिवरेऐलकडील ठाणीं मोंगलाचीं उठविलीं. कऱ्हाडी पडदुलाखान होता त्याजवर महाराज स्वामी खासाच चालून आले, तों तो निघोन इसलामपुरास आला. कऱ्हाडीं ठाणें घातलें, आणि इसलामपुरास वेढा देऊन बैसलें. तेव्हां येसबा राजश्री स्वामीबरोबर होते. आपले बाप येळावींत होते. मोंगलाशीं सल्ला करून मिरजेस लाऊन दिला, आणि इसलामपुरीं ठाणें बैसविलें. तेसमयीं येसबास महाराजांनीं बोलाऊन सांगितलें कीं,तुमचे चुलते येळावींत आहेत, त्यांजपवेतों तुह्मीं जाऊन, त्यांस विचार सांगून, दर्शनास घेऊन येणें, सर्वप्रकारें त्यांचें चालवूं. ऐसें सांगून पाठविलें. ते येळावीस गेले, तीर्थरूपाची भेट घेतली, आणि महाराजांचे आज्ञेप्रमाणें अवघा मजकूर सांगितला; परंतु तीर्थरूप शिदोजीबावा यांचे विचारास ते गोष्टी न आली.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57